---|| संभाजीराजांची खरी ओळख ||---
शिवपुत्र धर्मवीर संभाजीराजे ! संभाजी महाराजांबद्दल अस्सल पुराव्याअभावी परकियांनी बरेच विकृत लिखाण केले, संभाजीराजांची खरी ओळख करून देणारा हा लेख.....
शिवपुत्र धर्मवीर संभाजीराजे !
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अस्सल पुराव्याअभावी परकियांनी बरेच विकृत लिखाण केले. संभाजीराजांच्या वधानंतर झुल्फीकारखानाने रायगडचा पाडाव केला व तेथील सर्व दप्तरखाना व कागदपत्रे जाळून टाकली त्यामुळे सर्व पुरावेच नष्ट झाले. विकृत व चुकीच्या लिखाणामुळे समाजात शंभूराजांबद्दल बरेज गैरसमज निर्माण झाले. आज ही चुकीच्या इतिहासामुळे आपण अजूनही एकात्म होऊ शकलो नाही; परंतु औरंगजेबाच्या दरबारातील खाफीखान याने संभाजीराजांबद्दल केलेले वर्णन जेव्हा उजेडात आले त्यानंतर मात्र आमचे डोळे उघडले. खाफीखानाने संभाजीराजांचे वर्णन `सत्तेची नशा चढलेला राजा' असे केले; पण ग्रँड डफ याने या वाक्याचा `ध' चा `मा' केला व `दारूची नशा चढलेला राजा' असे केल्याने `संभाजी म्हणजे रंगेल' राजा असा चुकीचा इतिहास आम्हाला शिकावा लागला.
हिंदुत्वाचे महान रक्षक : धर्मवीर संभाजीराजे !
महाराष्ट्राचा तेजस्वी आणि प्रेरणादायी इतिहास दुर्दैवाने गोर्या कातडीच्या इंग्रजांनी कलंकित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे समाजाची बराच काळपर्यंत दिशाभूल झाली होती. श्री छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत तेजस्वी आणि महापराक्रमी प्रजापालक होते, ही बाब श्री. वा.सी. बेंद्रे यांच्यासारख्या विद्वान इतिहास संशोधकांनी समाजासमोर मांडली आणि एका महान सत्याला उजाळा मिळाला. संभाजीराजांची खरी ओळख करून देणारा हा लेख त्यांच्या अलौकिक कृत्यांची माहिती देतो.
औरंगजेबाला २७ वर्षे उत्तर हिंदुस्थानापासून दूर ठेवणारे संभाजीराजे
संभाजीराजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्पायुष्यात केली, त्याचा दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्थानावर झाला. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक हिंदु बांधवाने कृतज्ञ राहिले पाहिजे. त्यांनी औरंगजेबाच्या आठ लाख सैन्याला न डगमगता तोंड दिले आणि कित्येक मोगल सरदारांना लढाईत पराभूत करून त्यांना पळता भूई थोडी केली. त्यामुळे औरंगजेब दीर्घकाळ महाराष्ट्रात लढत राहिला आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्थान त्याच्या दडपणापासून मुक्त राहिला. ही संभाजीराजांची सगळयात मोठी कामगिरी म्हणावी लागेल. त्यांनी औरंगजेबाबरोबर तह केला असता, त्याचे मांडलिकत्व स्वीकारले असते, तर तो दोन-तीन वर्षांत पुन्हा उत्तरेत गेला असता; परंतु संभाजीराजांच्या संघर्षामुळे २७ वर्षे औरंगजेब दक्षिणेत अडकून राहिला आणि त्यामुळे उत्तरेत बुंदेलखंड, पंजाब आणि राजस्थान या ठिकाणी हिंदूंच्या नवीन सत्ता उदयाला येऊन हिंदु समाजाला सुरक्षितता लाभली.
संभाजीराजांच्या सामर्थ्याची पोर्तुगिजांना भीती
संभाजीराजांनी गोव्यावर आक्रमण करून धर्मवेड्या पोर्तुगिजांना नमवले. त्यांच्याशी तह करून त्यांना बांधून टाकले. गोव्यातील पोर्तुगिजांच्या धर्मप्रसाराला संभाजीराजांनी पायबंद घातला, त्यामुळे गोवा प्रदेशातील हिंदूंचे रक्षण झाले, हे विसरणे अशक्य आहे. पोर्तुगीज संभाजीराजांना प्रचंड भीत असत. त्यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे, ``सध्याच्या परिस्थितीत संभाजी महाराज हेच सर्वशक्तीमान आहेत, असा आमचा अनुभव आहे !'' शत्रूचे हे प्रमाणपत्र महाराजांच्या सामर्थ्याविषयी कल्पना देणारे आहे.
संभाजीराजांचा जाज्वल्य धर्माभिमान !
संभाजीराजांच्या बलीदानाचा इतिहास लोकांना नीट माहीत नाही. १ फेब्रुवारी १६८९ या दिवशी सख्खा मेहुणा गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी संभाजीराजे काही वतनदारांची गाऱ्हाणी ऐकत असतांना पकडले गेले. आमचा पराभव करण्याची ताकद आज जगातील कोणत्याही शक्तीला नाही. आमचा पराभव आमच्यातील गद्दार फितूर मंडळींमुळेच झाला, याची अनेक उदाहरणे आहेत. अगदी वर्तमानकाळही त्याला अपवाद नाही. शंभूराजांचे वेळीसुद्धा हेच झाले. येसुबाईचे थोरले बंधू म्हणजे शंंभूराजांचे मेव्हणे गणोेजी शिर्के हिंदवी स्वाराज्याशी बेईमान-फितूर झाले. संभाजीराजे कवी कलशाचे कलाने वागतात म्हणून कलशावर पन्हाळा भागात त्यावर हल्ला चढवला, ही बातमी जेव्हा संभाजी महाराजांना कळली, तेव्हा ते लगेच शिर्क्यांचा बिमोड करण्यासाठी विशालगडावर आले. शंभूराजे चालून येत असल्याचे कळताच गणोजी शिर्के संगमेश्वर भागात पळून गेले. शिर्क्यांच्या मदतीला औरंगजेबाचे सैन्य येण्यापूर्वीच संभाजीराजांनी कवी कलश, संताजी घोरपडे, मालोजी घोरपडे, खंडोबल्लाळ चिटणीस यांच्यासह शिर्क्यांची बंडाळी मोडून काढली व त्याचा जबरदस्त पराभव केला. तिकडे झुल्पीकार खान रायगडावर चालून येत असल्याची खबर राजांना मिळाल्याने शंभूराजे सातारा-वाई-महाड मार्गे रायगडावर परतणार होते; पण मुकर्रबखान कोल्हापूरपर्यंत येऊन पोहोचल्यामुळे शंभूराजांनी संगमेश्वर मार्गाने चिपळूण-खेड मार्गे रायगडावर जाण्याचा बेत केला. शंभूराजे स्वत: संगमेश्वरी आल्याची वार्ता आसपासच्या भागात वार्यासारखी पसरली. शिर्क्यांच्या बंडाळीमुळे उद्ध्वस्त झालेली मंडळी आपल्या तक्रारी घेऊन संभाजीराजांकडे येऊ लागली. रयतेच्या तक्रारी समजून घेऊन त्या सोडवण्यात त्यांचा वेळ गेला आणि संगमेश्वरला ४-५ दिवसांचा मुक्काम करावा लागला. तिकडे कोल्हापूरवरून मुकर्रबखान निघून चालू येत असल्याचे राजांना कळले. कोल्हापूर ते संगमेश्वर हे अंतर ९० मैलांचे आणि तेसुद्धा सह्याद्रीच्या दर्याखोर्यांनी व्यापलेले अवघड वाटेचे ! त्यामुळे किमान ८-१० दिवसांच्या अंतराचे; परंतु फितूर झालेल्या गणोजी शिर्क्याने मुकर्रबखानाला जवळच्या आड वाटेने केवळ ४-५ दिवसांतच संगमेश्वरला आणले. संभाजीचा बदला घेण्याच्या उद्देशाने शिर्क्यांनी फितुरी केली होती व आपली जहागीरी प्राप्त करण्यासाठी त्याने हा उद्योग केला. त्यामुळे १ फेब्रुवारी १६८९ रोजी मुकर्रबखानने त्याच्या ३ हजार सेनेच्या मदतीने शंभूराजांना वेढ्यात पकडले.
संभाजीराजांचा वेढा तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न
संगमेश्वरला ज्या सरदेसाई यांच्या वाड्यात शंभूराजे मुक्कामाला होते, त्या वाड्याला खानाचा वेढा पडला, हे जेव्हा राज्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांना आश्चर्यच वाटले; कारण इतक्या कमी दिवसांत खान येणे शक्यच नाही, हे त्यांना माहीत होते; पण ही किमया केवळ फितुरीची होती, हेसुद्धा त्यांच्या लक्षात आले. शंभूराजांनी अगोदरच आपली फौज रायगडकडे रवाना केली होती व केवळ ४००-५०० सैन्यच हाताशी ठेवले होते. याच वेळी शंभूराजांकडे कृष्णाजी चिमूल व अर्जोजी यादव हे आपल्या तक्रारी घेऊन आले होते. आता खानाचा वेढा मोडून रायगडकडे प्रयाण करणे हा एकमेव पर्याय राजांपुढे शिल्लक होता; म्हणून राजांनी शत्रूवर तुटून पडा, असा आदेश आपल्या सैनिकांना दिला. या परिस्थितीतही न डगमगता शत्रूचा वेढा तोडून संभाजीराजे, संताजी घोरपडे व खंडोबल्लाळ रायगडच्या दिशेने वेगात निघाले. दुर्दैवाने मालोजी घोरपडे या धुमश्चक्रीत ठार झाले; पण संभाजीराजे व कवी कलश हे मात्र वेढ्यात अडकले. संभाजीराजांनी याही स्थितीत आपला घोडा वेढ्याच्या बाहेर काढला होता; पण मागे असणार्या कवी कलशाच्या उजव्या हाताला मुकर्रबखानाचा बाण लागून ते खाली पडल्याने त्यांना वाचवण्यासाठी राजे पुन्हा मागे वळले आणि वेढ्यात सापडले.
स्वकियांच्या बेईमानीमुळे राजांचा घात !
या वेळी अनेक सैनिक ठार झाल्यामुळे त्यांचे घोडे इतस्तत: उधळत होते सर्वत्र धुरळा उडाला होता. कोणालाच स्पष्ट दिसत नव्हते. त्याचा फायदा घेऊन शंभूराजे पुन्हा सरदेसाइंर्च्या वाड्यात शिरले. त्यांचा घोडा मात्र तिथेच होता. धुरळा खाली बसल्यावर गणोजी शिर्क्यांनी शंभूराजांचा घोडा ओळखला; कारण राजांच्या घोड्याच्या पायात सोन्याचा तोडा असायचा व हे शिर्क्यांना माहीत होते; म्हणून त्यांनी खानाच्या सेनेला संभाजींचा शोध जवळपासच घ्यावा, अशी सूचना केली. अखेर मुकर्रबखानच्या मुलाने म्हणजे इरवलासखानाने शंभूराजांना पकडले. फितुरीमुळे शेवटी सिंहाचा छावा शत्रूच्या हाती गवसला. जंग जंग पछाडूनसुद्धा सतत ९ वर्षे सात लाख सेनेच्या हाती जो सापडला नाही, बादशहाला ज्याने कधी स्वस्थता लाभू दिली नाही, असा पराक्रमी योद्धा स्वकियांच्या बेईमानीमुळे मोगलांच्या जाळयात अडकला.
संभाजीराजांच्या बलीदानानंतर महाराष्ट्रात क्रांती घडली
संभाजीराजांच्या या बलीदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि पापी औरंग्याबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला. `गवताला भाले फुटले आणि घराघरांचे किल्ले झाले, घराघरातील माता-भगिनी आपल्या मर्दाला राजाच्या हत्येचा सूड घ्यायला सांगू लागल्या', असे त्या काळाचे सार्थ वर्णन आहे. संभाजी महाराजांच्या बलीदानामुळे मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला, ही तीनशे वर्षांपूर्वीच्या राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली. यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचे सैन्य वाढत गेले आणि सैन्याची संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली. जागोजागी मोगलांना प्रखर विरोध सुरू झाला आणि अखेर महाराष्ट्रातच २७ वर्षांच्या निष्फळ युद्धानंतर औरंगजेबाचा अंत झाला आणि मोगलांच्या सत्तेला उतरती कळा लागून हिंदूंच्या शक्तीशाली साम्राज्याचा उदय झाला.
२७ वर्षे औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणाविरुद्ध मराठ्यांनी केलेल्या संघर्षात हंबीरराव, संताजी, धनाजी असे अनेक युद्धनेते होते; परंतु या लढ्याला कलाटणी मिळाली ती संभाजीराजांच्या बलीदानातून झालेल्या जागृतीमुळेच.
" श्री शिवरायांच्या अकाली मृत्यूनंतर नऊ वर्षे संभाजीराजांनी औरंगजेबाच्या टोळधाडीपासून हिंदवी स्वराज्याचे संरक्षण आणि संवर्धन केले. फितुरीमुळे शत्रूच्या तावडीत सापडलेल्या राजांनी मृत्यू स्वीकारला; परंतु स्वधर्म आणि स्वाभिमान सोडला नाही ! त्यांच्या बलीदानामुळे मराठे पेटले आणि मोगल हटले ! हा महाराष्ट्राच्या विजयाचा ज्वलंत इतिहास आहे. हा प्रेरणादायी इतिहास साकार होणार आहे `शंभूतीर्थ' या शंभूछत्रपतींच्या स्मारकाच्या रूपाने ! "
संदर्भ : http://majheraje.blogspot.com/2009/12/blog-post_4094.html
शिवाजी महाराजांनंतर नऊ वर्षे औरंगजेबाला झुंजवत ठेवणारा राजा ही संभाजीराजांची ओळख पुरेशी नाही काय ?
ReplyDeletemahatwachi mahiti ahe
ReplyDelete